Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल! सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘बाबांची तब्येत ठीक आहे’; प्रफुल्ल पटेलही भेटीला
- महाराष्ट्र - मुंबई

शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल! सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘बाबांची तब्येत ठीक आहे’; प्रफुल्ल पटेलही भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांनी महत्त्वाची माहिती दिली.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नियमित वैद्यकीय तपासणीसाठी ते रुग्णालयात गेले असता डॉक्टरांनी त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात धाव घेतली.

प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटले की, शरद पवार सकाळी पुण्याहून मुंबईकडे येत असताना प्रवासादरम्यान त्यांना थोडा दम लागत होता. त्यामुळे नेहमीच्या डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्यासाठी ते ब्रीच कँडी रुग्णालयात आले. पवार यांची भेट घेतली तेव्हा ते जेवण करत होते. त्यांची प्रकृती चांगली असून काळजी करण्यासारखे काहीही नाही, असे पटेल यांनी स्पष्ट केले.

सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची बैठक सोडून गाठले रुग्णालय

शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने ब्रीच कँडी रुग्णालय गाठले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, रोहित पवार आणि अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह आगामी राजकीय रणनीतीवर बैठकीत चर्चा सुरू होती. मात्र, वडिलांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच सुप्रिया सुळे यांनी बैठक अर्धवट सोडली आणि रुग्णालयाकडे रवाना झाल्या. तेथे त्यांनी डॉक्टरांची भेट घेऊन शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, ‘पवार साहेबांची तब्येत चांगली’

शरद पवार यांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, माध्यमांमधून पवार साहेब रुग्णालयात असल्याचे समजल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी आलो. भेटीच्या वेळी ते जेवण करत होते. त्यांनी हसून आपुलकीने स्वागत केले. त्यानंतर त्यांच्या पत्नींकडूनही प्रकृतीची माहिती घेतली.

पवार साहेबांची तब्येत चांगली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत अनावश्यक चिंता व्यक्त करू नये. सध्या त्यांना विश्रांतीची आवश्यकता आहे. त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गर्दी करून त्रास देणे योग्य ठरणार नाही, असे आवाहनही पटेल यांनी केले. त्यांना रुग्णालयातून नेमके कधी डिस्चार्ज मिळणार, याबाबत मात्र त्यांनी कोणतीही निश्चित माहिती दिली नाही.

15 दिवसांपूर्वीही प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात उपचार

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांत शरद पवार यांना दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साधारण 15 दिवसांपूर्वी दिवाळीच्या काळात त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यावेळी त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर मुंबईत परतल्यानंतर पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. काही काळ प्रवास टाळण्याचा आणि प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला होता.

प्रकृती सुधारल्यानंतर राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांत सहभाग

मागील उपचारांनंतर शरद पवार यांनी पुन्हा सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली होती. नुकतेच त्यांनी पुण्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून ऊस उत्पादनासंदर्भात सुरू असलेल्या प्रयोगाची माहिती घेतली होती. शेती, सहकार आणि राजकीय विषयांवरील घडामोडींमध्येही ते सक्रिय होते. मात्र, आज पुन्हा वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पवार यांची प्रकृती चांगली आहे. डॉक्टरांच्या पुढील तपासणीनंतर त्यांना कधी डिस्चार्ज मिळणार, हे स्पष्ट होणार आहे.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/