Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • वाशिममध्ये पाणी बचतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; महिला बचत गटांनी गावागावांत जनजागृती करावी
- महाराष्ट्र - विदर्भ

वाशिममध्ये पाणी बचतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; महिला बचत गटांनी गावागावांत जनजागृती करावी

वाशिम जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पाणी बचतीसाठी महिला बचत गटांनी पुढाकार घेऊन गावागावांत जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.

वाशिम: जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि पाण्याचा अपव्यय रोखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पाणी बचतीचा संदेश गावागावांत आणि घराघरांत पोहोचवून ही मोहीम लोकचळवळ बनवावी. यासाठी महिला स्वयंसहायता गटांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वाशीम जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी बचत आणि पाण्याचा अपव्यय रोखण्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, नगरपालिका सहआयुक्त डॉ. बाबुराव बिक्कड आणि शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पाणी बचतीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महिला स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. दैनंदिन जीवनात पाण्याचा अनावश्यक वापर टाळणे, उपलब्ध पाण्याचा योग्य विनियोग करणे आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत पाणी बचतीचे महत्त्व पोहोचविणे यावर विशेष भर देण्याचे त्यांनी सांगितले.

या जनजागृती मोहिमेसाठी सर्व संबंधित शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे. महिला बचत गटांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला पाणी बचतीच्या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, उमेद अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), महिला व बालकल्याण, महिला व बालविकास आणि शिक्षण विभागाच्या जनजागृतीविषयक नियोजनाचा आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी पाणी बचतीसाठी प्रस्तावित उपक्रमांची माहिती सादर केली. काही अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

पाणी ही मौल्यवान नैसर्गिक संपत्ती असून तिचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. पाणी बचत ही केवळ सरकारी मोहीम न राहता नागरिकांची लोकचळवळ व्हावी, यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/