बुलढाणा: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या दुष्काळ संघर्ष यात्रेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची जिद्द पाहायला मिळत आहे. गेल्या 13 दिवसांपासून सततचा प्रवास, दिवसभरातील अनेक सभा आणि शेतकऱ्यांशी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेला संवाद यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. 26 नोव्हेंबर रोजी देऊळगावराजा तालुक्यातील गोंधनखेड येथे त्यांना अशक्तपणा जाणवू लागल्याने शेतातच सलाईन देण्याची वेळ आली. विशेष म्हणजे, उपचार पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत ते पुन्हा पुढील सभेसाठी रवाना झाले.
शेतात झाडाखालीच डॉक्टरांकडून उपचार
दुष्काळ संघर्ष यात्रेच्या तेराव्या दिवशी गोंधनखेड येथे दुपारच्या भोजनासाठी शेतकरी गजानन जायभाये यांच्या शेतात यात्रा थांबली होती. याचवेळी रविकांत तुपकर यांना अशक्तपणा जाणवू लागला. परिस्थिती लक्षात घेऊन देऊळगावमही येथील डॉ. राहुल गायकवाड यांना उपचारासाठी बोलावण्यात आले. शेतात उपलब्ध असलेल्या झाडाच्या सावलीतच तुपकरांवर उपचार करण्यात आले. सलाईनची बाटली लावण्यासाठी स्टँड उपलब्ध नसल्याने शेतातील सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या स्प्रिंकलरचा आधार घेण्यात आला. सुमारे तासभर सलाईन दिल्यानंतर तुपकरांनी पुन्हा आपल्या नियोजित दौऱ्याला सुरुवात केली.
13 दिवसांचा दौरा, दिवसाला 15 ते 20 सभांचा धडाका
14 नोव्हेंबर रोजी मलकापूर येथून सुरू झालेली दुष्काळ संघर्ष यात्रा आता तेराव्या दिवसात पोहोचली आहे. या काळात तुपकर दररोज विविध गावांना भेट देत असून, अनेक ठिकाणी 15 ते 20 सभांच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. सकाळपासून सुरू होणारा दौरा रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. सभांनंतरही त्यांचा शेतकऱ्यांशी संपर्क सुरूच असतो. मुक्कामाच्या ठिकाणी भेटायला येणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेणे, संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे आणि प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, असा त्यांचा दिनक्रम आहे. सततच्या भाषणांमुळे त्यांचा आवाज बसला असून घशाचा आणि तोंडाचा त्रासही जाणवत आहे. यापूर्वी सावखेड तेजन येथील सभेत त्यांनी दिवसाला दोन तासांपेक्षाही कमी झोप मिळत असल्याचे सांगितले होते.
सलाईननंतर पुन्हा माईक हातात; शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठाम भूमिका
गोंधनखेड येथे उपचार घेतल्यानंतर तुपकर आळंद येथील सभेला उपस्थित राहिले. तेथे पुन्हा माईक हातात घेत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपली भूमिका मांडली. हेक्टरी एक लाख रुपयांची नुकसानभरपाई, सरसकट कर्जमाफी, पीकविम्याचा योग्य लाभ आणि शेतमालाला हमीभाव मिळावा, अशा प्रमुख मागण्यांचा त्यांनी पुनरुच्चार केला. यासोबतच 4 डिसेंबर रोजी बुलढाणा येथे आयोजित करण्यात येणाऱ्या दुष्काळ एल्गार महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.
4 डिसेंबरच्या महामोर्चासाठी गावोगावी जनजागृती
दुष्काळ संघर्ष यात्रेला ग्रामीण भागातून प्रतिसाद मिळत असताना तुपकरांच्या प्रकृतीचा प्रश्नही समोर आला आहे. सततचा प्रवास आणि अपुरी विश्रांती यामुळे शरीरावर ताण येत असतानाही त्यांनी यात्रा थांबवलेली नाही. साध्या मुक्कामाच्या व्यवस्थेत राहून ते दररोज नव्या गावात पोहोचत आहेत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, कर्जाच्या ओझ्यातून दिलासा मिळावा आणि शेतीमालाला योग्य दर मिळावा, या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आता 4 डिसेंबरच्या बुलढाणा येथील महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर गावोगावी शेतकऱ्यांची एकजूट करण्यावर भर दिला जात आहे.




