डिलिमिटेशन विधेयकावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत, त्यांचा विरोध हा केवळ राजकीय भूमिकेतून असल्याचा आरोप केला आहे. प्रत्यक्षात मतदारसंघांची पुनर्रचना विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याची जाणीव राऊत यांनाही असल्याचा दावा त्यांनी केला.
बावनकुळे यांच्या मते, डिलिमिटेशनमुळे मतदारसंघांची व्याप्ती कमी होऊन लोकप्रतिनिधींना नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचता येईल. सध्या काही विधानसभा मतदारसंघांमध्ये ४ ते ५ लाखांपर्यंत मतदारसंख्या असल्याने विकासकामे आणि सरकारी योजनांची अंमलबजावणी करताना अडचणी निर्माण होतात. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यास प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक चांगला होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनाही बावनकुळेंचे आवाहन
डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याचे आवाहन करत बावनकुळे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचाही उल्लेख केला. त्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केल्यास लोकप्रतिनिधींच्या हिताच्या भूमिकेला समर्थन दिले असेल, असे ते म्हणाले. हा केवळ एनडीएचा राजकीय विषय नसून सर्व लोकप्रतिनिधींशी संबंधित मुद्दा आहे, असे स्पष्ट करत त्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनेही या विधेयकाचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहन केले. राहुल गांधी यांनी आपल्या पक्षातील खासदारांची भूमिका समजून घ्यावी, असेही त्यांनी म्हटले. महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक खासदार या विधेयकाच्या बाजूने असल्याचा दावाही बावनकुळे यांनी केला.
डिलिमिटेशनमुळे देशात मोठे बदल होतील
महिलांना आरक्षण आणि मतदारसंघांची पुनर्रचना या मुद्द्यांचा उल्लेख करत बावनकुळे यांनी या विधेयकाचे समर्थन केले. मतदारसंघ अधिक सुटसुटीत झाल्यास केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे सोपे होईल. त्यामुळे या विधेयकाकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून न पाहता विकासाच्या दृष्टीने विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांकडून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय कारणांमुळे विरोध केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. हे विधेयक मोठ्या बहुमताने मंजूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संजय राऊतांनी खासदारांची माफी मागावी
संजय राऊत यांनी खासदारांबाबत केलेल्या विधानांवरही बावनकुळे यांनी तीव्र आक्षेप घेतला. सर्व खासदारांना पैशांच्या व्यवहारात सहभागी असल्याप्रमाणे संबोधणे चुकीचे असून, अशा वक्तव्यांमुळे लोकप्रतिनिधींच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचतो, असे ते म्हणाले. स्वतः खासदार म्हणून काम केलेल्या राऊत यांनी सर्व खासदारांबाबत सरसकट आरोप करू नयेत. त्यांनी आपल्या विधानाबद्दल खासदारांची माफी मागावी, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.
वाळू माफियांविरोधात कठोर कारवाई सुरू
दरम्यान, राज्यातील वाळू माफियांवरही बावनकुळे यांनी भाष्य केले. प्रशासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात सरकार कठोर भूमिका घेत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत. वाळू माफियांचे नेटवर्क मोडून काढण्यासाठी कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.




