बीड: दुष्काळ आणि कमी पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील ढाकेफळ येथील युवा शेतकरी बालासाहेब थोरात यांनी आधुनिक शेतीच्या जोरावर यशाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेतीची वाट निवडली. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी सात एकर क्षेत्रात शिमला मिरचीचे तब्बल 50 टन उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे, पहिल्याच संपूर्ण तोडणीत त्यांना सुमारे 19 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
पदव्युत्तर शिक्षणानंतर शेतीची निवड
बालासाहेब थोरात यांची एकूण 17 एकर शेती आहे. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मर्यादित संधी लक्षात घेऊन त्यांनी शेतीतच काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. मागील सहा वर्षांपासून ते एक ते दीड एकर क्षेत्रावर शिमला मिरचीचे उत्पादन घेत होते. या माध्यमातून त्यांना दरवर्षी 8 ते 10 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळत होता. याच अनुभवाच्या जोरावर यंदा त्यांनी शिमला मिरचीची लागवड सात एकरांपर्यंत वाढवली.
मल्चिंग आणि ठिबक सिंचनातून पाण्याची बचत
यंदा पावसाचा अनिश्चित अंदाज असल्याने शेतीचे नियोजन करताना त्यांच्यासमोर पाण्याचे आव्हान होते. मात्र, त्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला. सात एकर क्षेत्रात बेसल डोस देऊन मल्चिंग पेपर अंथरण्यात आला. तसेच प्रत्येक वाफ्यात ठिबक सिंचनाच्या दोन नळ्या सोडण्यात आल्या. या पद्धतीमुळे पाण्याची बचत होण्यासोबतच त्यांचा खुरपणीवरील खर्चही कमी झाला. 15 सप्टेंबर 2026 रोजी त्यांनी सात एकर क्षेत्रावर तब्बल 1 लाख 25 हजार शिमला मिरचीच्या रोपांची लागवड केली होती.
पहिल्याच तोडणीत 50 टन उत्पादन; 19 लाखांची कमाई
गेल्या दहा दिवसांपासून शिमला मिरचीची काढणी सुरू आहे. पहिल्याच संपूर्ण तोडणीत तब्बल 50 टन उत्पादन मिळाले. व्यापारी थेट शेतावर येऊन माल खरेदी करत असून, शिमला मिरचीला प्रतिकिलो 35 ते 40 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे पहिल्याच तोडणीत सुमारे 19 लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे. यंदा लागवड, खते, औषधे आणि इतर कामांसाठी सुमारे 15 लाख रुपये त्यांचा खर्च झाला होता. हा संपूर्ण खर्च पहिल्याच तोडणीत भरून निघाल्याने बालासाहेब यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील अडीच महिने उत्पादन सुरू राहण्याची अपेक्षा असून, त्यातून आणखी उत्पन्न मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सौर ऊर्जा प्रकल्पामुळे सिंचनाचा प्रश्न सुटला
दोन वर्षांपूर्वी शेतात बसवलेल्या शासनाच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा त्यांना मोठा फायदा होत आहे. पूर्वी वीजपुरवठा खंडित होत असल्याने रात्री-अपरात्री शेतात जाऊन पिकांना पाणी द्यावे लागत होते. मात्र, सौर ऊर्जेमुळे आता दिवसा सिंचन करणे शक्य झाले आहे. याशिवाय शेतात विहीर खोदून गावातील बोअरवेलचे पाणी त्यात सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या पिकांच्या सिंचनासाठी चांगली व्यवस्था निर्माण झाली आहे.
40 महिलांना मिळाला रोजगाराचा आधार
बालासाहेब थोरात यांच्या शिमला मिरचीच्या शेतीमुळे गावातील सुमारे 40 महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. दुष्काळी परिस्थितीत या महिलांना मिळणारा रोजगार त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक आधार ठरत आहे. त्यामुळे त्यांच्या शेतीतील यशाचा फायदा केवळ त्यांनाच नव्हे, तर गावातील इतर कुटुंबांनाही होत आहे.
खतांच्या वाढत्या किमतीमुळे उत्पादन खर्चात वाढ
एकीकडे विक्रमी उत्पादन आणि चांगले उत्पन्न मिळत असले, तरी वाढत्या खतांच्या किमतीमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक आव्हान उभे राहिले आहे. पूर्वी 3 हजार 800 रुपयांना मिळणारी 12:61 वॉटर सॉल्युबल खताची बॅग आता सुमारे 5 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. शासनाने खतांच्या वाढत्या दरांकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी बालासाहेब थोरात यांनी केली आहे.
दुष्काळी भागातही योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि मेहनतीच्या जोरावर शेती फायदेशीर ठरू शकते, हे बालासाहेब थोरात यांनी आपल्या यशातून दाखवून दिले आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील तरुण शेतकऱ्यांसमोर आधुनिक शेतीचा एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.




