मुंबई: म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत 4462 सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीकरिता ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी दि. 22 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सोडतीसाठी आतापर्यंत 1,67,570 अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह 104086 अर्ज प्राप्त झाले आहेत.
सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. 24 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजेपासून सुरू झाली. सोडतीमध्ये 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी पुणे येथील मांजरी खुर्द , म्हाळुंगे, भूगाव येथील सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका हद्दीतील धानोरी, वारजे, कात्रज, हडपसर, पाषाण, खराडी, बाणेर, धायरी, लोहगाव, बिबडेवाडी, मुंढवा, ऊंड्री, वडगाव, बावधन, कोंढवा खुर्द येथे सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मोशी, किवळे, डुडूळगाव, ताथवडे, वाकड, चिखली, रावेत, पुनावळे, वाकड, बालेवाडी, रहाटणी, वडमुखवाडी, मानुर्डी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव येथील सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
अर्जदारांनी IHLMS 2.0 या प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अपलोड केलेले डोमिसाईल प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला MahaIT कडून तसेच आयकर विवरण हे आयकर विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने पडताळणी करण्यात येते. परंतु, त्या प्रक्रियेस काही वेळ लागत असल्यामुळे अर्जदारांच्या विनंतीचा विचार करून ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अर्जदारांना दिनांक 15 ऑक्टोबर 2026 रात्री 11:59 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु MahaIT कडून डोमिसाईल प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला पडताळणी होण्यात अडचणी येत आहेत. अद्यापपर्यंत एकूण 3872 डोमिसाईल प्रमाणपत्र व 9142 उत्पन्नाचे दाखले पडताळणीसाठी प्रलंबित आहेत. वरील बाबींचा विचार करून अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी सदर मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
