देशाच्या राजकारणात सध्या डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून चर्चेला उधाण आले आहे. केंद्र सरकारने डिलिमिटेशन विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी दिल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या विषयावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
डिलिमिटेशन प्रक्रियेला काँग्रेसचा विरोध नसल्याचे सांगतानाच, या प्रक्रियेमुळे राज्यांच्या लोकसभेतील जागांचे परस्पर प्रमाण बदलता कामा नये, अशी महत्त्वाची अट चव्हाण यांनी मांडली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे.
कोणालाही विश्वासात न घेता विधेयक आणल्याचा आरोप
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या विशेष संसदीय अधिवेशनावरही प्रश्न उपस्थित केले. संसदेचे पावसाळी अधिवेशन अद्याप औपचारिकरीत्या स्थगित झालेले नसल्याने सध्याचे अधिवेशन हा त्याच प्रक्रियेचा पुढील टप्पा असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच डिलिमिटेशनसारखा महत्त्वाचा विषय मांडण्यापूर्वी विरोधी पक्षांशी चर्चा होणे आवश्यक होते. मात्र, सरकारने सर्व पक्षांना विश्वासात न घेता हा प्रस्ताव पुढे आणल्याचा आरोप त्यांनी केला.
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको!
डिलिमिटेशन विधेयकातील नेमक्या तरतुदी समोर आल्यानंतरच काँग्रेस आपली अंतिम भूमिका निश्चित करेल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. मात्र, मतदारसंघांची पुनर्रचना करण्यास पक्षाचा तत्त्वतः विरोध नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, डिलिमिटेशन करताना प्रत्येक राज्याच्या लोकसभेतील जागांचे सध्याचे तुलनात्मक प्रमाण कायम राखणे गरजेचे आहे. अन्यथा लोकसंख्येच्या आधारावर जागांचे पुनर्वाटप झाल्यास लोकसंख्या नियंत्रणात यश मिळवलेल्या दक्षिण भारतातील राज्यांचे प्रतिनिधित्व तुलनेने कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी केंद्र सरकारने घेतली पाहिजे. महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी डिलिमिटेशन आवश्यक असल्याचा सरकारचा दावा दिशाभूल करणारा असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली. या मुद्द्यावरून त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर जोरदार प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
डिलिमिटेशनचा इतिहास काय सांगतो?
डिलिमिटेशन ही भारतीय संविधानातील तरतूद असून यापूर्वी 1951, 1961 आणि 1971 च्या जनगणनेनंतर मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली होती. मात्र, लोकसभेतील राज्यनिहाय जागांचे प्रमाण वारंवार बदलल्यास काही राज्यांचे राजकीय प्रतिनिधित्व कमी होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन 1976 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारने 1971 च्या जनगणनेच्या आधारे लोकसभेतील राज्यनिहाय जागांचे वाटप गोठवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय 25 वर्षांसाठी होता. यानंतर 2001 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने ही मर्यादा आणखी 25 वर्षांसाठी वाढवली. त्यामुळे 2026 हे वर्ष या कालमर्यादेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहे.
आता केंद्र सरकारच्या पुढील भूमिकेकडे लक्ष
डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतभेद दिसून येत आहेत. एकीकडे महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा पुढे केला जात आहे, तर दुसरीकडे राज्यांचे राजकीय प्रतिनिधित्व आणि दक्षिणेकडील राज्यांच्या हितसंबंधांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसची भूमिका काही प्रमाणात स्पष्ट झाली असली, तरी विधेयकातील प्रत्यक्ष तरतुदी समोर आल्यानंतर पक्ष कोणती भूमिका घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




